मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतून सर्वाधिक जागा लढण्याचा निर्धार करणाऱ्या शिवसेनेने (ठाकरे) महाविकास आघाडीतील मित्रपक्षांवर दबाव टाकण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. त्या दृष्टिकोनातून मुंबईतील २२ जागांवर आपले संभाव्य उमेदवार निश्चित केले असून, यामध्ये शिवसेना उपनेते आदित्य ठाकरे (चरळी), विनोद घोसाळकर (दहिसर), अमोल कीर्तीकर (जोगेश्वरी पूर्व), राजुल पटेल (वर्सोवा), वरूण सरदेसाई (वांद्रे पूर्व) आदींचा समावेश असल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपावरील चर्चेच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने (ठाकरे) तीन जागा जिंकल्याने मुंबई जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने आघाडीच्या बैठकीत मुंबईतील ३६ मतदारसंघांच्या वाटपावरून सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने जिंकलेल्या १६ जागांवर प्रामुख्याने चर्चा सुरू आहे. परंतु, ठाकरेंच्या शिवसेनेने सुरुवातीपासूनच मुंबईत २० ते २२ जागा लढण्याचा निर्धार करत मित्रपक्षांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. आता मुंबईतील २२ जागांवरील ठाकरेंनी आपले उमेदवारही निश्चित करून मित्रपक्षांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे. संभाव्य उमेदवारांमध्ये २०१९ मध्ये निवडणूक जिंकलेल्या आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आली आहे.
हे आहेत संभाव्य उमेदवार
विलास पोतनीस, उदेश पाटेकर (मागाठाणे), विनोद घोसाळकर (दहिसर), सुनील प्रभू (दिंडोशी), अमोल कीर्तीकर, बाळा नर, शैलेश परब (जोगेश्वरी पूर्व), ऋतुजा लटके (अंधेरी पूर्व), राजू पेडणेकर, राजुल पटेल (वर्सोवा), वरुण सरदेसाई (वांद्रे पूर्व), विशाखा राऊत, महेश सावंत (माहीम), अजय चौधरी, सुधीर साळवी (शिवडी), आदित्य ठाकरे (वरळी), किशोरी पेडणेकर, रमाकांत रहाटे (भायखळा), ईश्वर तायडे (चांदिवली), अनिल पाटणकर, प्रकाश फातर्पकर (चेंबूर), रमेश कोरगावकर (भांडुप), सुनील राऊत (विक्रोळी), संजय पोतनीस (कलिना), विठ्ठल लोकरे, प्रमोद शिंदे (अणुशक्तीनगर), सुरेश पाटील (घाटकोपर), प्रविणा मोरजकर (कुर्ला), नीरव बारोट (चारकोप), समीर देसाई (गोरेगाव), श्रद्धा जाधव (वडाळा) यांचा समावेश असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.