मुंबई : बदलापूर प्रकरणात वकील असीम सरोदे यांनी पोलिसांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी आक्षेप घेतला. सरोदे हे शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप त्यांनी केला. बदलापूर प्रकरणानंतर विरोधकांनी आरोपीला फाशी द्या, अशी मागणी केली होती. त्याबाबत खटला सुरू आहे. मात्र, ताब्यात असताना आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला आणि स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांच्या कृतीवर संशय व्यक्त करून सरोदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
कोर्टात जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, सरोदे आणि ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप कायंदे यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात सरोदे यांनी ‘निर्भय बनो आंदोलना’च्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेचा दाखला कायंदे यांनी यावेळी दिला. सरोदे राजकीय अजेंडा राबवत आहेत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.