मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली पहिली उमेदवार यादी गुरुवारी संध्याकाळी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत आठ उमेदवारांचा समावेश आहे. मुंबई दक्षिण मध्यमधून विद्यमान खासदार राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक आणि हातकणंगल्यातून धैर्यशील माने यांच्यासह आठ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत ठाणे आणि नाशिकचा उमेदवार अद्याप घोषित करण्यात आलेला नाही. ठाण्यावर भारतीय जनता पक्षाने तर नाशिकवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्याची माहिती मिळत आहे.
यापूर्वी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपले उमदेवार जाहीर केले आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे उमेदवार मैदानात उतरवले आहेत.
जाहीर झालेल्या उमेदवारांची नावे
राहुल शेवाळे- मुंबई दक्षिण मध्य
संजय मंडलिक- कोल्हापूर
सदाशिव लोखंडे- शिर्डी
प्रतापराव जाधव- बुलढाणा
हेमंत पाटील- हिंगोली
श्रीरंग बारणे- मावळ
राजू पारवे- रामटेक
धैर्यशील माने-हातकणंगले
ठाण्यासह नाशिकच्या जागेचा सस्पेन्स कायम
शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर जाहीर झाली असली, तरी त्यामध्ये नाशिक आणि ठाण्याच्या जागेचा समावेश नाही. या दोन्ही जागांवर सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाला भारतीय जनता पक्षाकडून विरोध आहे, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्या जागेवर दावा केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याच्या जागेवरच भाजपने दावा केला आहे. ही जागा मिळावी म्हणून भारतीय जनता पक्ष आग्रही आहे. तर ठाणे हा शिवसेनेचा गड असल्याने एकनाथ शिंदेही ती जागा सोडण्यास तयार नाहीत.
तसेच कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील हे निश्चित असले, तरी त्यांचे नाव पहिल्या यादीत नाही. त्याचबरोबर यवतमाळ-वाशिमच्या जागेवरून देखील तिढा आहे. वाशिममधून पाच वेळच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांच्या नावाला भारतीय जनता पक्षाने विरोध केला आहे. तर मंत्री असलेल्या संजय राठोड यांना उमेदवारी द्यावी, असा भाजपचा आग्रह आहे. परंतु, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
शिवसेनेच्या दोन्ही गटाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिवसेना अशी चार ठिकाणी लढत होणार आहे.
अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे -दक्षिण मध्य मुंबई
भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे- शिर्डी
नरेंद्र खेडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव- बुलढाणा
नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध हेमंत पाटील- हिंगोली
संजोग वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणे- मावळ
महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी भाजपने आतापर्यंत सर्वाधिक 24 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर काँग्रेसने 12, शिवसेना- उद्धव ठाकरे गटाने 17, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 2 उमेदवार जाहीर केले आहेत. त्याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.