मुंबई : ठाकरे गटाने खोटी कागदपत्र दिली असल्याचा दावा शिंदे गटाने केला होता. यालाच उत्तर म्हणून ठाकरे गटाने थेट निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनाही सुनावणीला बोलवण्याची विनंती राहुल नार्वेकर याना पत्राद्वारे केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनाही विधानसभा अध्यक्षांनी समन्स पाठवून कागदपत्राची पडताळणी करावी असंही या पत्रात म्हटलं आहे.(CM Eknath Shinde)
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला 4 एप्रिल 2018 रोजी दाखल केलेल्या पत्रावर सुनील प्रभू यांच्या उलट तपासणी दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर ठाकरे गटाकडून अध्यक्षांना पत्र लिहिण्यात आलं आहे. यामध्ये थेट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सुनावणी दरम्यान बोलवण्यासाठी समन्स पाठवावे, अशी विनंती ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना केली आहे.
तसेच शिवसेना पक्षाची झालेली प्रतिनिधी सभा, त्यासोबतच शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेल्या दुरुस्ती संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खा. अनिल देसाई यांनी 4 एप्रिल 2018 रोजी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं असल्याचं ठाकरे गटांनी सांगितलं. मात्र या पत्रावर आक्षेप घेत अशा प्रकारचे कुठलेही पत्र निवडणूक आयोगाला त्यासोबतच याचिकेदरम्यान सादर झालेला नसल्याचं शिवसेना शिंदे गटाने उलट तपासणी करताना अध्यक्षांसमोर मांडलं होत. (Uddhav Thackeray news )
अनिल देसाई यांनी शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेली दुरुस्ती आणि पक्षप्रमुख पदाला देण्यात आलेले सर्व अधिकार याबाबतची माहिती निवडणूक आयोगाला पाठवली आहे. त्यामुळे हे सगळं आता रेकॉर्डवर आणण्यासाठी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सुनावणी दरम्यान बोलवले जावे आणि या कागदपत्राची छाननी व्हावी, तसेच उद्धव ठाकरे यांनी दिलेले उत्तर याची मूळ प्रत या सुनावणीदरम्यान रेकॉर्डवर आणली जावी, अशी ठाकरे गटाची मागणी आहे.(Rahul Narwekar)