शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. आज महायुतीकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अशोक भाजपकडून चव्हाण, मेधा कुलकर्णीं आणि नांदेडच्या अजित गोपछडेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. उद्या हे सर्व उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. तर, राष्ट्रवादीकडून अद्याप कुणाचेही नाव जाहीर झालेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी दिली जाते यावरून चर्चा आहे.
जानेवारी महिन्यात मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तब्बल 55 वर्षांपासून देवरा कुटुंबिय काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. पण दक्षिण मुंबई मतदार संघातून उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात येताच मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या जागेवर उद्धव ठाकरे गटाने दावा ठोकला आहे. त्यामुळे देवरा यांना काँग्रेसमधून संधी मिळणार नव्हती.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना त्यांनी एक पत्र लिहित नाराजी व्यक्त केली होती. गांधी घराण्याशी आणि काँग्रेसपक्षाशी माझ्या कुटुंबाचे असलेले नाते कायम राखण्यासाठी माझी पक्षाशी बांधिलकी कायम राहिली. एक दशक मी वैयक्तिक पद किंवा सत्ता न मागता पक्षासाठी विविध भूमिकांमध्ये अथक परिश्रम केले, असे त्यांनी पत्रातून म्हटले होते.
कोण आहेत मिलिंद देवरा?
मिलिंद देवरा यांचा 4 डिसेंबर 1976 रोजी मुंबईत जन्म झाला. मिलिंद देवरा यांचे वडिल मुरली देवरा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. मिलिंद देवरा हे उच्चशिक्षित असून त्यांनी अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठातन पदवीचं शिक्षण घेतलं. चित्रपट निर्माते मनमोहन शेट्टी यांची मुलगी पूजा शेट्टी हिच्याशी त्यांनी 2008 मध्ये लग्न केलं. 2004 मध्ये मिलिंद देवरा यांली पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि मुंबई जिमखान्याचेही ते सदस्य आहेत.