मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी शांतता असली तरी, शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत मात्र मोठी खळबळ माजली आहे. आगामी निवडणुका लांब असल्या तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता ‘भाकरी फिरवण्याचे’ संकेत दिले आहेत. “जे काम करतील तेच पदावर राहतील,” अशा कडक शब्दात शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले असून, अकार्यक्षम नेत्यांची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या मोहिमेची सुरुवात गेल्या आठवड्यात पुण्यापासून झाली. पुण्याची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करून शिंदेंनी राज्यातील इतर नेत्यांना मोठा संदेश दिला आहे. आता केवळ खुर्ची उबवणाऱ्या नेत्यांचे दिवस संपले आहेत. शाखा प्रमुखापासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांच्या कामाचे रिपोर्ट कार्ड स्वतः एकनाथ शिंदे तपासणार आहेत. पक्ष वाढीसाठी ज्यांनी काम केले त्यांनाच पुढ संधी मिळेल, असा हा ‘क्लीनअप’ प्लॅन आहे.
दोन मंत्र्यांवर टांगती तलवार?
सर्वात खळबळजनक बाब म्हणजे, मंत्रिमंडळातील दोन बड्या मंत्र्यांवर उपमुख्यमंत्री प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे. अनेक मंत्री मात्र आपापल्या जिल्ह्यात अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. केवळ सरकारी निधी मिळवण्यासाठी पक्षात राहिलेल्या नेत्यांना आता डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे.आता ‘भाकरी’ कोणत्याही क्षणी फिरवली जाऊ शकते. अशी चर्चा आहे.
निवडणुका नसल्या तरी प्रत्येक बुथवर (BLA) शिवसेनेचा कार्यकर्ता सक्रिय असला पाहिजे, असे आदेश देण्यात आले आहेत. भविष्यात होणाऱ्या मतदारसंघांच्या विभाजनासाठी पक्ष आतापासूनच सज्ज होत आहे.
सत्ताधारी पक्षात होणारे हे फेरबदल केवळ अंतर्गत नसून, त्याचा परिणाम प्रशासनावरही होऊ शकतो. थोडक्यात, शिंदेंची शिवसेना आता ‘कॉन्टिटी’पेक्षा ‘क्वालिटी’ला महत्त्व देऊन येणाऱ्या तीन वर्षात पक्षाची पायमुळे घट्ट करण्यास सज्ज झाली आहे.







