मुंबई : भाजपची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून यामध्ये महाराष्ट्रातील एकही उमेदवार नसल्याने राज्यातील महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा हा अत्यंत गुंतागुंतीचा होत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत महायुतीकडून कोणत्याच उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली नाही.
अशातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौरा करत जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाशी चर्चा केली. मात्र, अंतिम जागा वाटप दिल्लीमधूनच होणार आहे. त्यामुळे भाजपच्या वाटेला जागा किती येणार? शिंदे आणि अजित पवार गटाला किती जागा मिळणार? याचं उत्तर मात्र मिळाल नाही.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ४८ पैकी सर्वाधिक जागा भाजपच लढणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिंदे आणि अजित पवार यांच्या वाटेला १० पेक्षा कमी जागा देण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील अधिकाधिक जागांवर भाजपचे उमेदवार रिंगणात असतील.
त्यामुळे पवार शिंदे गटाला सिंगल डिजिट अर्थात एक आकडी जागा मिळतील, असं बोललं जात आहे. दुसरीकडे, जागा वाटपासाठी बैठकांवर बैठका सुरू असल्या तरी अंतिम निर्णय हा दिल्लीमधूनच होणार असल्याच सांगितलं जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासह राज्यातील भाजपचे नेते बैठकीसाठी दिल्लील रवाना झाले आहेत.