अंबरनाथ : अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. ऋतुजा गणेश जंगम असे या मृत महिलेचे नाव आहे. ती कर्जतमध्ये राहणारी होती. मंगळवारी रात्री ८.३० च्या दरम्यान ही घटना घडली असून या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेनच्या गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत अधिक माहीत अशी की, ऋतुजा ही एका खासगी ट्रॅव्हल कंपनीमध्ये कामाला होती. ती ठाण्याहून कर्जत लोकलने परतत असताना अंबरनाथ रेल्वे स्थानकात गर्दीच्या रेट्यामुळे खाली उतरली. पण घरी जायला उशीर होत आहे, हे लक्षात येताच ती पुन्हा त्याच लोकलमध्ये चढली. पण गर्दीमुळे तिला आतमध्ये शिरता आले नाही. ती दारातच उभी राहिली. आणि इथेच घात झाला. अंबरनाथ स्थानकातून ट्रेन सुटताच अवघ्या काही अंतरावर गर्दीमुळे तिचा हात सटकला आणि ती खाली पडली.
या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तिला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास..
दरम्यान मध्य रेल्वेच्या बहुतांश लोकल गाड्या या संध्याकाळी उशिरा धावत असतात. तसेच संध्याकाळी कामावरुन घरी परतणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे लोकलमध्ये नेहमीच गर्दी बघायला मिळते. अनेकदा लोकल ट्रेनमध्ये पाय ठेवण्याइतकीही जागा नसते. त्यातच एखादी लोकल सुटली तर दुसरी लोकल कधी आणि किती वाजता येईल, वेळेत येईल की नाही, याचा काहीही पत्ता नसतो. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर राहणारे अनेक प्रवाशी हे कायम आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात.