मुंबई : पालघर तालुक्यातील वैतरणा नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर अचानक शार्क माशाने हल्ला चढवला. २०० किलोहून अधिक वजनाच्या माशाने थेट तरुणाच्या पायाचा लचकाच तोडला आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विकी गोवारी (वय ३२) असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना मंगळवार १३ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास घडली. या नदी पात्रात महाकाय शार्क मासा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मनोर येथील सायलेंट हॉटेल जवळील वैतरणा खाडीत मंगळवारी विकी हा मासेमारी करण्यासाठी गेला होता. खाडीतील पाण्यात मासेमारी करत असताना अचानक शार्क माशाने त्याच्यावर हल्ला केला. या हल्यात विकीचा पाय जवळपास एक-दीड फूट गेला आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो बेशुद्ध पडला. यानंतर तातडीने उपचारासाठी दादरा नगर हवेलीतील विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैतरणा नदी पात्रात महाकाय शार्क मासा आढळून आल्याने स्थानिक नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत.