मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने जुलै 2023 मध्ये शरद पवारांची साथ सोडत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणावे तसे यश मिळवता आले नाही. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत असणारे बरेच नेते अस्वस्थ असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत असणाऱ्या नेत्यांना घरवापसी करु वाटली, तर त्यांना पुन्हा पक्षात घेणार का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी ‘सवालही पैदा नही होता’, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. आज (दि. १५) यशवंतराव सेंटर मुंबई येथे महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. यावेळी शरद पवार हे बोलत होते. या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि महाविकास आघाडीचे इतर नेते उपस्थित होते.