नवी दिल्ली: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर आता शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तीन नावांची मागणी केली आहे. यामध्ये नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या नावांचा समावेश आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी निकाल देताना राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि त्यांचे चिन्ह घड्याळ हे अजित पवारांना दिले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला हा मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला स्वतंत्र गटाची मान्यता देत त्यासाठी नवीन नाव आणि चिन्हाची मागणी करण्याचे निर्देश दिले होते. आयोगाच्या निर्देशानंतर आता शरद पवार गटाने तीन नावांची मागणी केली आहे. तर पक्षासाठी वटवृक्ष या चिन्हाची मागणी केली आहे.