मुंबई : नुकत्याच सुपर पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने आपली ताकद दाखवून दिली. आता राज्यातील सर्वच पक्षांच्या नजर लागून राहिल्या आहेत त्या म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकांकडे. विधानसभा निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी एकत्रपणे लढणार आहे. राज्यातील एक बडे नेते शरद पवार विधानसभांच्या कामाला लागले आहेत.
शरद पवार यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी डावपेच आखायला सुरवात केली आहे. त्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा सांगावा धाडला आहे. येत्या दोन दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लढवू इच्छित असलेल्या विधानसभा जागांची माहिती शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मागवली आहे. यावरून शरद पवार गट किती जागा घेणार याकडे लक्ष लागून आहे.
तसेच मविआतील घटकपक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस हे पक्ष लढवू इच्छित असलेल्या विधानसभा जागांची माहितीही शरद पवार यांनी मागवून घेतली आहे. पुढील आठवड्यात मतदार संघनिहाय माहिती आल्यानंतर लगेचच महाविकास आघाडीची एकत्रित बैठक पार पडून 288 जागांबाबत चर्चा होणार आहे. त्यापूर्वी शरद पवार यांनी आपली सर्व यंत्रणा कामाला लावून विधानसभा मतदारसंघांच्या जागांबाबत माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे.
ही माहिती आल्यानंतर शरद पवार विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार यश मिळाले होते. महाविकास आघाडीने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 30 जागांवर विजय मिळवला होता. शरद पवार यांच्या पक्षाने एकूण 10 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 8 जागांवर शरद पवार गटाच्या उमेदवारांनी विजय मिळविला होता. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा 80 टक्क्यांचा स्ट्राईक रेट राहिला होता. ही पक्षासाठी जमेची बाजू मानली जात आहे.
विधानसभा निवडणुकीतही शरद पवार यांचा अनुभव ही मविआसाठी जमेची बाजू ठरु शकते. तसेच शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यानंतरच मविआला 30 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असे भाकीत केले होते. विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा आता शरद पवार जोमाने उतरले आहेत . याचा फायदा नक्कीच मविआला होईल असे बोलले जात आहे. तसेच लोकसभा निकालाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे होईल आणि राज्यात सत्ताबदल अटळ असल्याचा ठाम विश्वास शरद पवार यांनी मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता.