मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज जोरदार हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी सांगतात की शरद पवार आणि माझे संबंध चांगले आहेत. मी पवार साहेबांच बोट धरून राजकारणात आलो आहे. आजकाल जी परिस्थिती आहे त्यातून मला माझ्या बोटाची काळजी वाटत आहे. आपलं बोट भलत्याच व्यक्तीच्या हातात दिल्यावर काय होतं ते आता दिसत आहे, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मला आठवतंय की ज्या वेळी शेती व्यवसायाची जबाबदारी माझ्यावर आली. मी शपथ घेतली आणि घरी आलो अधिकाऱ्यांनी पहिली फाईल माझ्यासमोर आणली. देशात अन्न धान्याचा साठा कमी झाल्याने मी फार अस्वस्थ झालो होतो. जगाचा पोशिंदा शेतकरी आणि आपल्या देशात दुसऱ्या देशात अन्नधान्य बाहेर आणावं लागलं, मात्र, त्यानंतर भारत जास्त गहू पिकवणारा देश झाला आहे, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.
सकाळी आम्ही मालवण येथील घटनेचा निषेध केला, अनेकजण उपस्थित होते. अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. 1960 साली यशवंतराव मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याकडे पुतळा बसवला त्याला अजूनही काही झालेलं नाही, पण यांचा पुतळा 6 महिन्यात पडला. त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला आलं कोण तर मोदी..त्यांचा हात जिथ लागतोय तिथं काहीतरी उलटं सुलट होत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली आणि लगेच सांगितलं की सावरकर यांची माफी मागण्यात आली नाही. आता विषय काय आहे आणि हे बोलतायत काय? आता शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना होऊ शकते का? ज्यांनी रयतेच राज्य आणल त्यांची तुलना कशा प्रकारे देशाचे पंतप्रधान करतात हे आपण सर्वानी पाहिलं आहे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.