मुंबई : मराठी रंगभूमीसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नाट्यकर्मींचा दरवर्षी नाट्य परिषदेच्या वतीने सन्मान केला जातो. यंदा देखील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी या ज्येष्ठ कलावंतांना मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी अशोक सराफ यांनी शरद पवार यांचे भरभरून कौतुक केले.
अशोक सराफ म्हणाले, लोकांना कला आवडत गेली मी करत गेलो. अशात मराठी नाट्य परिषदेकडून मिळालेला पुरस्कार हा महत्वाचा होता. त्याहून पुढे पवारसाहेबांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणं हे खूप महत्वाचं होतं. शरद पवार माझे आवडते नेते आहेत. माझं एक काम होतं ते त्यानी तीन मिनिटात केलं होतं.
मला विश्वास नव्हता, मी म्हटलं तिथे बोला. ते म्हटले काम झालय आणि खरचं झालं. अजूनही ते प्रत्येकाला नावाने ओळखतात. मी पहिल्यादा भेटलो तेव्हा ते हसले तेव्हा मला ते ओळखतात हे कळालं. दुसऱ्यांदाही भेटले तेव्हाही गर्दीत त्यांनी मला ओळखलं. पवार यांनी बरचं काम करून ठेवलं, असं अशोक सराफ म्हणाले.
पुढे बोलताना अशोक सराफ म्हणाले, माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. शब्दात मांडणं कठीण आहे. एका लाईनीत चौथा मिळालेला हा पुरस्कार आहे. हे पुरस्कार कुठून मिळतात, कुणाच्या हस्ते मिळतात हे महत्वाचं आहे. शासनाचा मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्यावेळी मी थोड काय तरी केलं असं जाणवलं.
त्यानंतर तिसऱ्या दिवशी दिल्लीच्या संगीत अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर मंगेशकर फॅमिलीतर्फे मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला, असंही अशोक सराफ यावेळी म्हणाले. यावेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, उद्योग मंत्री उदय सामंत अशी मंडळी उपस्थित होती.