मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ईव्हीएमविरोधातील आंदोलन मोडित काढायला मारकडवाडीत जाऊन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन पवारांवर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पडळकर यांच्या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचे जाहीरपणे कान टोचत दमाने घेण्याचा सल्ला दिला आहे.
पडळकर नेमकं काय म्हणाले?
‘१०० शकुनी मामा मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला येतात’ अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. तर सदाभाऊ खोत यांनी गावगाड्याची भाषा म्हणत पवार यांना एकेरी भाषेत संबोधले होते. दोघांनीही पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे विरोधकांनी भाजपला जोरदार लक्ष्य केले. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोत आणि पडळकर यांना चांगलाच दम भरला.
बावनकुळे यांच्याकडून पडळकर आणि खोत यांची कानउघाडणी..
शरद पवार हे अतिशय मोठे नेते आहेत. त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका वेगळी आहे. पण पवार यांच्यावर अतिशय वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर टीका पक्षाला अजिबात मान्य होणार नाही. ज्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये केली, त्यांना आम्ही समज देऊ, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. शरद पवार यांनी एकेकाळी महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. त्यांच्यासारखेच इतरही पक्षातील मान्यवर नेत्यांनी राज्याचे नेतृत्व केले आहे. अशा नेत्यांवर बोलताना तार्तम्य बाळगले पाहिजे.
अशा प्रकारची विधाने पक्षाला मान्य नाहीत. येथून पुढे अशी विधाने होणार नाहीत, याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ, असेही बावनकुळे यांनी सांगितले. तसेच गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याची पक्षाकडून गंभीर दखल घेण्यात आलिया आहे. वैचारिक विरोधक असले तरी वैयक्तिक टीका पक्षाला अमान्य असल्याचे बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे.