मुंबई: शरद पवार यांच्या हातातून केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष काढून घेतला आहे. चिन्हही काढून घेतलं आहे. ज्याने पक्षाला जन्म दिला, पक्ष वाढवला, त्यांच्या हातूनच त्यांचा पक्ष काढून घेण्यात आला आहे. त्यानंतर शरद पवार गटाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. त्यांनी दिल्लीत वकिलांशी चर्चा सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबत हे खलबतं सुरू आहेत. कोर्टात काय मुद्दे मांडायचे, पुरावे काय द्यायचे आणि निवडणूक आयोगाने काय म्हटले आहे, यावर दिल्लीत खल सुरू आहे.
उगवता सूर्य घेणार
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत शरद पवार गटाला पक्षाची तीन नवीन नावे सूचवण्यास सांगितलं आहे. तसेच तीन नवी चिन्हही द्यायला सांगितली आहेत. त्यामुळे पवार गटाकडून उद्या पक्षाचे नवं नाव आणि चिन्ह सूचवलं जाणार आहे. शरद पवार गट उगवता सूर्य हे चिन्ह घेण्याची शक्यता आहे. हे चिन्ह घेऊन पवार गट राज्यात पुन्हा नव्याने शून्यातून आपला श्रीगणेशा करण्याची शक्यता आहे. तर, शरद पवार गट पक्षाचे काय नाव निवडणूक आयोगाला देतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.