नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह घड्याळ हे अजित पवारांना देण्यात आल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला नवं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडून केनरीय निवडणूक आयोगाने तीन नावं मागवली होती त्यापैकी हे एक नाव आहे. त्यानुसार, निवडणूक आयोगानं शरद पवारांना दिलेलं नाव हे ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असं असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह घड्याळ अजित पवारांना दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांच्या पक्षाचे नाव देण्यास सांगितले होते. याची मुदत बुधवारी दुपारी ४ वाजता संपली होती. त्यानुसार शरद पवार गटाने तीन नावांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे दिला होता. यापैकीच एक नाव निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीपुरते हे नाव असल्याचेही आयोगाच्या आदेशात म्हटले गेले आहे.
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – एस अशी तीन नावे शरद पवार गटाने दिली होती. शरद पवार वटवृक्ष चिन्हासाठी आग्रही होते. आता चिन्ह कोणते देतात हे देखील औत्युक्याचे ठरणार आहे.