मुंबई : ‘भारताच्या स्थितीत बदल घडवण्याची गरज आहे. देशाची ताकद ज्या लोकांच्या हातात आहे, त्यांनी शेतकऱ्यांचा, महिलांचा आणि सर्व घटकांचा हिरमोड केला आहे. तुम्हाला त्यांच्याकडून आश्वासनं दिली जातील, पण तुम्ही बळी पडू नका’, अशा शब्दांत इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार यांनी भाजपवर टीका केली.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची रविवारी (दि.17) मुंबईतील शिवाजी पार्कवर जाहीरसभा पार पडली. या सभेला देशातील दिग्गज नेते उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी, शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्यासह अनेक दिग्गज नेतेमंडळींची उपस्थिती होती.
शरद पवार म्हणाले, ‘देशातील परिस्थितीत बदल आणण्याची गरज आहे. दबावतंत्राविरोधात आपल्याला पाऊले उचलावी लागतील. आश्वासन पूर्ण न करणाऱ्यांना सत्तेपासून दूर करायचे आहे. नरेंद्र मोदी यांनी देशाला खोटी गॅरंटी दिली. महात्मा गांधी यांनी मुंबईतून इंग्रजांविरोधात ‘छोडो भारत’ घोषणा दिली होती. आता त्याच शहरातून ‘छोडो भाजप’ असा नारा आपल्याला द्यावा लागले. भारताच्या स्थितीत बदल घडवण्याची गरज आहे. देशाची ताकद ज्या लोकांच्या हातात आहे, त्यांनी शेतकऱ्यांचा, महिलांचा आणि सर्व घटकांचा हिरमोड केला आहे’.
तसेच टीव्हीवर आपण एक खोटी गोष्ट ऐकली आहे. मोदींची गॅरंटी, ही गॅरंटी चालणारी नाही. खोटं आश्वासन देऊ त्यांनी आपल्याला वेगळ्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न केला. पण आजपासून टीव्हीवर ही गॅरंटी दिसणार नाही. कारण निवडणूक आयोगाने ती रोखण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाचे आभार मानत आहोत, असेही पवार यांनी म्हटले.
राहुल गांधी म्हणाले, ‘गेल्यावर्षी आम्ही कन्याकुमारीपासून यात्रेची सुरुवात केली. आम्हाला यात्रा करावी लागली. मी काही वर्षांपूर्वी याचा विचारही केला नसता. सोशल मीडिया, मीडिया हे देशाच्या हातात नाही. हिंसा, महागाई, तरुणांच्या समस्या हे मुद्दे मीडियात पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे आम्हाला ही यात्रा करावी लागली. कारण दुसरा कोणताही उपाय नव्हता’.
‘…आता त्यांच्या डोक्यात हवा गेली’
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘दिल्लीतील हुकूमशाही तडीपार करण्यासाठी शिवाजी पार्क निवडण्यात आलं. भाजप फुगा आहे, आम्ही त्यात हवा भरली होती. संपूर्ण भारतात यांचे दोन खासदार होते. आम्ही त्यात हवा भरली, आता त्यांच्या डोक्यात हवा गेली. त्यांना घटना बदलण्यासाठी 400 पार करायचे आहे’. तसेच ‘मी राहुल गांधींचे आभार मानतो. कारण त्यांनी ‘भारत जोडो’ची सांगता मुंबईत महाराष्ट्रात केली’, असेही त्यांनी सांगितले.