पुणे: शरद पवार यांनी थेट सहकार मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना पाडण्याचं आवाहन तिथल्या जनतेला केलं आहे. सगळं देऊनही निघून गेले, ते नागरिकांशी निष्ठा पाळणार नाहीत. असं म्हणत शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांना पराभूत करण्याचं आवाहन आंबेगाव मतदारसंघातील जनतेला केलं आहे.
राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे हे शरद पवार यांचे मानसपुत्र मानले जातात. वळसे पाटील यांच्या मतदारसंघातच आज शरद पवार यांची तोफ धडाडली. यावेळी पवार यांनी दिलीप वळसेंवर जोरदार हल्ला चढवला. वळसेंकडे निष्ठाच नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना काय द्यायचं राहिलं होतं? काय कमी पडू दिलं? आमदार केलं, अनेक मंत्रीपदे दिली, विधानसभेचं अध्यक्षपद दिलं, देशाच्या साखर उद्योगाचं अध्यक्षपद दिलं, अनेक संस्थांवर काम करण्याची संधी दिली एवढं सर्व देऊनही त्यांच्यात पाच टक्केही निष्ठा राहिली नाही. ते निघून गेले. असे लोक नागरिकांशीही निष्ठा पाळणार नाहीत. त्यांना धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे, असं शरद पवार म्हणाले.
तुरुंगात टाकण्याची धमकी आली नी दुसऱ्या बाजूला गेले
शरद पवारांनी बोलताना पुढे म्हटले की, मागच्या निवडणुका आठवा. मागच्या निवडणुकीत आपल्या जिल्ह्यातील उमेदवार कुणाच्या नावावर निवडणूक लढवत होते? निवडणुकीत त्यांनी कुणाचा फोटो वापरला? हे सर्व माहीत असताना कुठून तरी तुरुंगात टाकण्याची धमकी आली, भीतीचं संकट आलं म्हणून हे लोक दुसऱ्या बाजूला गेले. त्यामुळे आपल्याला जागं व्हावं लागेल. अनेक ठिकाणी तुमच्या जिल्ह्यातील लोकांनी माझ्यासोबत काम केलं. अनेक लोक होते त्यांनी माझ्यासोबत काम केलं. आज हे लोक नाहीत. या लोकांचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्याकडे निष्ठा होती. त्यांनी निष्ठेशी तडजोड केली नाही. राज्यात आम्ही पक्षाची स्थापना केली. तो पक्ष फोडला. पक्षातील अनेक लोक आहेत. त्यांना निवडून कुणी दिलं?, असा सवाल शरद पवार यांनी केला.