मुंबई : मोठी विश्रांती घेतल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा अॅक्टीव्ह झाले आहेत. ते नेहमी विराधकांचे घोटाळे बाहेर काढतात, अशी त्यांची प्रतिमा बनली आहेत. आता त्यांनी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेतला घोटाळा अर्थात पीएपी घोटाळ्यात थेट शरद पवार आणि कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. 20 हजार कोटींचा हा घोटाळा असल्याचे ते म्हणाले आहेत. त्याशिवाय, या घोटाळ्याची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
हा घोटाळ्यात शाहीद बलवा आणि पवारांचे निकटवर्ती चोरडिया यांना लाभ मिळाला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलाय. 1 हजार 903 सदनिका बांधल्या जात आहेत. त्यासाठी वेगवेगळी आरक्षणं हटवली जात आहेत. शरद पवार आणि कुटुंबीयांनी देखील घोटाळ्याचा फायदा घेतला आहे. असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
प्रताप पवार यांचा संबंध
सोमय्या म्हणाले, भांडूप येथील 1,903 सदनिकेचे कॉन्ट्रॅक्ट चोरडीया बिल्डरच्या पुणे येथील न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. ला देण्यात आले होते. त्या कंपनीने यासाठी शरद पवारांचे बंधू प्रताप पवार यांच्या निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. कंपनीसोबत करार केला आहे. ही जागा प्रताप पवार यांच्या निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि.कंपनीची आहे. त्याच्या सोबत या सदनिका बांधण्यासाठीचे डेव्हलपमेंट राईट, करार चोरडिया समूहाच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. कंपनीने केले आहे.
40 लाख नफा
1,903 सदनिका महापालिका बाजारभावाने 58 लाखात एक सदनिका घेणार आहे. ही सदनिका बांधण्यासाठी जमीन व बांधकामाचा खर्च म्हणून 15 ते17 लाख खर्च होणार आहे. म्हणजेच एका सदनिकेच्या मागे रुपये 40 लाख नफा शरद पवार यांचे बंधू प्रताप पवार यांची कंपनी व चोरडिया बिल्डर्सच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी कंपनीला मिळणार आहे, असे सोमय्या म्हणाले.
सिरम इन्स्टिट्यूट
प्रताप पवार यांची निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. चे शेअर कॅपिटल फक्त रुपये 1 लाख आहे. परंतु या कंपनीत 19 मार्च 2021 रोजी सिरम इन्स्टिट्यूटने 435 कोटी रुपयाचे शेअर 6% व्याज या दराने वीस वर्षासाठी या कंपनीत प्रेफरेन्स शेअर कॅपिटल म्हणून गुंतवले आहेत.1 लाखाचे शेअर कॅपिटल प्रताप पवार व त्यांच्या पत्नीचे 435 कोटीचे गुंतवणूक 6% दराने सिरम इन्स्टिट्यूट यांनी केली आहे.
मुख्यमंत्री शिंदेंना चौकशीची मागणी
100 कोटीच्या गुंतवणूकीच्या समोर रुपये 1000 कोटीचा भांडूप पीएपी घोटाळ्याचा फायदा चोरडिया यांच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी कंपनीला झाला आहे. निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. कंपनीही त्यात सहभागी झाली आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.