मुंबई: विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मुंबईत मेरिटनुसार जागावाटप ठरवण्यात येणार आहे. मुंबईतील ३६ जागांपैकी सहा ते सात जागांचा अद्याप तिढा सुटलेला नाही. पुढील दोन दिवस आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठका होणार असून यावेळी उर्वरित राज्यातील जागांवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.
विधानसभेच्या आगामी निवडणुका तोंडावर आल्याने महाविकास आघाडीच्या जागावाटपावर गेल्या महिनाभरापासून खल सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी आघाडीच्या तीन बैठका झाल्या. बुधवारी वांद्रे येथील सॉफिटेल हॉटेलमध्ये चौथी बैठक पार पडली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड तर शिवसेनेकडून (ठाकरे) खासदार संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते.
दरम्यान, तीनही पक्षांनी विभागवार अहवाल मांडले. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा करून विभागवार आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागात कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत, लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला आघाडी मिळाली होती. प्रत्येक मतदारसंघात तीन प्रमुख पक्षांकडून इच्छुक उमेदवार कोण आहेत, यावर सल्लामसलत करण्यात आली.
तसेच कोणत्या मतदारसंघात कोणात्या पक्षाची ताकद जास्त आहे, कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो, हा निकष समोर ठेवून जागावाटप करण्यावर भर देण्यात आला होता. आता पुढील दोन दिवस सलग बैठका घेऊन मुंबईसह राज्यातील जागावाटपाचा निर्णय एकमताने घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.