मालवण : नौदल दिनानिमित्त राजकोट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी मुसळधार पाऊस व वादळी वा-यामुळे कोसळला. याप्रकरणी या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्टचरल इंजिनिअर चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता जयदीप आपटे फरार असल्याची माहिती समोर येत आहे.
जयदीप आपटे हा कल्याणमधील एक 25 वर्षीय प्रतिभाशाली मूर्तिकार आहे. त्याने राजकोट किल्ल्यावर 28 फूट उंच ब्राँझचा पुतळा साकारला होता. मात्र हा पुतळा त्याने अवघ्या सहा ते सात महिन्यांमध्ये तयार केला होता. या कामापूर्वी जयदीप आपटे याला इतके मोठे पुतळे उभारण्याचा कोणताही अनुभव नव्हता. त्यामुळे जयदीप आपटे याला नेमक्या कोणत्या निकषांच्या आधारे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम देण्यात आले? असा प्रश्न आता अनेकांकडून विचारला जात आहे.
शिल्पकार जयदीप आपटे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाल्याचे समोर येत आहे. त्याच्या कल्याणमधील वास्तव्यास असणाऱ्या घरालाही टाळे आहे. त्यामुळे पोलिसांकडून जगदीप आपटेचा शोध सुरू असून त्याला कधी अटक होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.