कल्याण : अकरावीमध्ये शिकणाऱ्या अनिश दळवी या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी सेक्रेड हार्ट या शाळेचे संचालक ऑलविन अँथोनी याला अटक केली आहे. कल्याण न्यायालयात त्याला दुपारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यीण चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्याण तालुक्यातील निंबवली गावात राहणारे व्यावसायिक अनिल दळवी यांचा १६ वर्षीय मुलगा अनिश हा वरप परिसरातील सेक्रेड हार्ट शाळेत शिकत होता. अनिश व त्याच्या दोन मित्रांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्याने शाळेचे संचालक अँथोनी याने तिघांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. तुमचा शाळा सोडल्याचा दाखला तुमच्या घरी येईल, अशी ताकीद देत त्यांना घरी पाठवले. या तिघापैकी अनिश दळवी याने दाखला घरी येण्याच्या भीतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
आत्महत्येनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला. अनिशच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी शाळेवर गंभीर आरोप केले. अनिशसोबत शाळेत गैरप्रकार घडला. त्याला अपमानास्पद वागणूक दिली गेली. एखाद्या मुलगा काही गैरप्रकार करीत असेल तर त्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने पालकांना दिली पाहिजे. तीन मुलापैकी दोन मुलांच्या पालकांना शाळेने बोलावले. मात्र आम्हाला कोणतीही सूचना देण्यात आली नाही. अनिशने त्याचाच धसका घेत आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. टिटवाळा पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला.
मात्र, अनिशच्या कुटुंबीयांनी शाळेचे संचालक अँथोनी याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर टिटवाळा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करीत अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळताच अनिशच्या नातेवाईकांनी न्यायालयाच्या आवारात एकच गर्दी केली होती. संतप्त नातेवाईक यावेळी हल्ला करण्याची शक्यता असल्याने अँथोनीला मोठ्या पोलीस बंदोबस्तात दोन तास उशिराने न्यायालयात हजर करण्यात आले.