वसई : वसईच्या नायगाव परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना शाळेतून घरी घेऊन जाणाऱ्या स्कूल बसने दोन सख्ख्या बहिणींना चिरडल्याची घटना घडली आहे. हो घटना शुक्रवारी १ मार्च दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेत दोन्ही मुलींना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या दोन्ही चिमुकल्या सख्ख्या बहिणी आहेत. त्या दोघींचे वय अनुक्रमे २ आणि ६ वर्ष आहे. त्या नायगाव पश्चिमेच्या अमोलनगर परिसरात राहतात. शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दोन्ही बहिणी एकमेकांचे हात धरून रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी वसई पश्चिम मधील सेंट ऑगस्टीन शाळेची बस मुलांना शाळेतून त्यांच्या घरी सोडायला जात होती. रस्त्यावर वळण असल्याने बसचालकाला चिमुकल्या मुली दिसल्या नाहीत.
काही समजण्याच्या आतच स्कूल बसने पायी जात असलेल्या दोन्ही चिमुकल्यांना धडक दिली. या धडकेत दोन्ही बहिणी बसच्या चाकाखाली आल्या. आरडाओरड झाल्यानंतर चालकाने तत्काळ बस थांबवली. स्थानिकांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या दोन्ही बहिणींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून यातील २ वर्षाच्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.