मुंबई : राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूकदार, मुकादम आदींसाठी ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार विमा’ योजनेला राज्य मंत्रिमंडाळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याबाबत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी केलेल्या पाठपुराव्यास अखेर मोठे यश आल्याचे बोलले जात आहे. परिणामी, या निर्णयाचे राज्यातील शेतकरी वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे.
मंत्री धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना त्यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करून त्याअंतर्गत यासंदर्भातील योजना प्रस्तावित केली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 10 लाख ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार, मुकादम तसेच दीड ते दोन लाख बैलजोड्या त्याचबरोबर कामगारांच्या झोपड्या यांना सुद्धा विम्याचे कवच या निर्णयानुसार लागू करण्यात येत आहे. या योजनेचा संपूर्ण खर्च ‘स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळा’च्या भांडवलातून करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगार, मुकादम, कारखाना यांपैकी कुणावरही कसलाही आर्थिक भार राहणार नाही.
बीडसह अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यातील 10 लाख ऊसतोड कामगार वेगवेगळ्या जिल्ह्यात तसेच शेजारील राज्यात कमीत कमी 6 महिने स्थलांतर करून उसतोडणीला जातात. ऊन, वारा, पाऊस, थंडी अशा कोणत्याही परिस्थितीत दिवसरात्र अत्यंत मेहनत व जोखमीचे काम त्यांना करावे लागते.
ऊसतोडणी व वाहतुकीदरम्यान अनेक अपघात, विजेचा शॉक, सर्पदंश, वाऱ्या-पावसाने नुकसान, रस्ते अपघात यांसारख्या शेकडो समस्यांना तोंड देताना ऊसतोड कामगारांचे अनेकदा जीव जातात, अनेकजण कायमस्वरूपी अपंग होतात व त्यांच्या कुटुंबाचा आधार नाहीसा होतो. त्यामुळे या ऊसतोड कामगारांना, वाहतूक कामगारांना तसेच त्यांच्या पशूंना स्वतंत्र अपघात विमा योजना असावी, व दुर्दैवाने मृत्यू झाल्यास आर्थिक मदत, अपंगत्व आल्यास आर्थिक मदत व उपचार अशा निरनिराळ्या तरतुदी असाव्यात, असं धनंजय मुंडे यांनी प्रस्तावित केले होते.
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित करून घेत श्री. मुंडे यांनी या महामंडळाला मूर्त स्वरूप दिले. महामंडळाचे कार्यकारी संचालक मंडळ तसेच लेखाशीर्ष निर्माण करून ऊसतोड कामगारांची प्रथमच ‘ऊसतोड कामगार’म्हणून नोंदणी केली. साखर कारखाना व त्याच्या समप्रमाणात निधी शासनाकडून अशी कायमस्वरूपी निधीची व्यवस्था केली.
मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थ व नियोजन विभागाच्या समन्वयातून या योजनेला मूर्त स्वरूप दिले असून, त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. ऊसतोड कामगारांना विम्याचे कवच असावे, हे दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न शासनाने पूर्ण केले आहे. याचा मनापासून आनंद वाटतो आहे, याबाबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धनंजय मुंडे यांनी मनापासून आभार मानले.