मुंबई : काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांसह अनेक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. उबाठा गटाचे काही आमदार देखील आहेत. त्यांचा पक्षप्रवेश एक ते दोन दिवसांत होईल. पुढच्या आठ दिवसांत अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळणार आहेत, असं सूचक वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधला, यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही आमदारांनी, मंत्र्यांनी कुठले मतदारसंघ आपल्याकडे हवेत. कुठे काय स्थिती आहे, याची चर्चा केली. बहुतेक मतदारसंघावर इतर पक्ष दावा करत आहेत.
त्यावर आग्रही भूमिका नेत्यांनी मांडली. ही निवडणूक लढवताना शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी त्या त्या मतदारसंघात त्या नेत्यांची कसं समन्वय साधला पाहिजे यावर चर्चा झाली. कुठल्याही मतदारसंघात आपला उमेदवार असेल तर भाजपा, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्यासोबत कसे असले पाहिजे यावर चर्चा झाली असं शिरसाट यांनी सांगितले.
युतीत काही जागांवर भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. यातच काही नेत्यांचं तिकीट देखील कापण्यात आलं आहे. तर काही नेत्यांचं तिकीट अद्याप जाहीर न झाल्याने ते नाराज आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले की, थोड्या कुरघोड्या असतात. पण शिंदे साहेबांनी सांगितले की, वरिष्ठ पातळीवर चर्चा होइल. तुमची मागणीवर चर्चा होइल. युतीमध्ये जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात, तेव्हा काही शेअर द्यावा लागतो. तक्रार करण्यापेक्षा युती धर्म पाळावा. असंही संजय शिरसाट म्हणाले.