मुंबई : गणपत गायकवाड यांनी गोळीबार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवत आहेत, असे गणपत गायकवाड यांनी म्हटले होते. विरोधकांनी देखील यावरुनच मुख्यमंत्र्यांनी लक्ष्य केले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रोज मुख्यमंत्र्याचा एक फोटो पोस्ट करून त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. या फोटोमध्ये मुख्यमंत्री एका गुंडांसोबत असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.
‘शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा’ असे म्हणत राऊत यांनी शिंदे यांचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे रोज असा एक फोटो टाकण्यात येणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत उभे असलेल्या दोघांच्या गळ्यात शिवसेनेचे उपरणे आहे. यातील एकाच्या चेहऱ्याला गोल रिंगण करण्यात आले असून, हा गुंड असल्याचा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात येत आहे.
राऊतांचे ट्वीट…
दरम्यान याबाबत ट्वीट करत संजय राऊत यांनी म्हटले आहे की, “शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा.. ठाणे पुणे परिसरात हत्या, अपहरण, सोन्याचांदीच्या दुकानांवर दरोडे, अशा दाखलेबाज गुन्ह्यात सहभागी असलेल्या या महाशयांचे स्वागत मुख्यमंत्री उत्साहाने करीत आहेत. पुणे आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी या दाखलेबाज महातम्याची माहिती जाहीर करावी!… गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य… असे राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणत आहे.
चार दिवसांत चार फोटो…
पहिल्या दिवशी पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या भेटीचा फोटो सुरवातीला संजय राऊत यांनी शेअर केला. दुसऱ्या दिवशी पुण्यातील गुंड निलेश घायवळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो संजय राऊत यांनी ट्वीट केला. तिसऱ्या दिवशी राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातील नामचीन गुंड जितेंद्र जंगम यांचा फोटो राऊत यांच्याकडून शेअर करण्यात आला आहे. आज चौथ्या दिवशी देखील राऊत यांनी शिंदे यांचा गुंडासोबतचा फोटो शेअर केला आहे.