मुंबई : शिवसेना पक्ष फुटीनंतर शिवसेनेच्या वर्धापन दिन दरवर्षी दोन ठिकाणी साजरा केला जातो. 19 जून 1966 रोजी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली होती. या शिवसेनेचा आज 58 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा षण्मुखानंद येथे होत असून शिंदे गटाचा मेळावा वरळी डोम येथे पार पडत आहे. त्यावरुन संजय राऊत यांनी डोमकावळ्यांचा मेळावा तिकडे होत आहे, असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेसह नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक आहे, फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी आपण मारली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे, तुमच्यासारख्या फडतूस माणसांसमोर आम्ही झुकणार नाही. मोदी जन्माला आल्यावर चारशे खुळखुळे घेऊन जन्माला आले होते. 400 पार हा जन्मसिद्ध अधिकार आहे का? मोदींचा खुळखुळा तर कोणी केला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी केला अशी टीका संजय राऊत यांनी मोदी यांच्यावर केली.
पुढे बोलताना म्हणाले, असंख्य हुतात्माच्या बलिदानातून शिवसेना स्थापन केली आहे, आता हे गुजरातचे सोमे गोमे आले आहेत. महाराष्ट्राचा वारसा उद्धव ठाकरे यांनी चालवला आणि लोकसभेत यश मिळवलं. भाजप आता आभार यात्रा धन्यवाद यात्रा काढणार आहे. कशाबद्दल पराभवाबद्दल आभार मानणार आहात काय? तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. अरे तुम्ही हरलाय आणि आभार यात्रा काय काढताय, असा सवाल राऊत यांनी केला आहे.
… त्यातला एक खांदा उद्धव ठाकरे तुमचा
महाभारत आणि रामायण हे पवित्र ग्रंथ आहेत, रामायणमध्ये सांगितलं सोन्याच्या हरणा मागे लागू नका. ते मृगजळ आहे, शिंदे आणि अजित पवार मृगजळ आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला सगळे दाखवलं. गद्दारी विश्वासघात मोदी शाह, फोडाफोडी अर्जुन अस्वस्थ झाला, म्हणाला कृष्णा हे जग मग तरेल कसं? तेंव्हा कृष्ण म्हणाला या पृथ्वीतलावर चार खांदे आहेत त्यातला एक खांदा उद्धव ठाकरे तुमचा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमनेही उधळली.