मुंबई : शिखर बँक घोटाळ्यात क्लीनचीट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. खटला चालवताना जो खर्च झाला आहे, तो कोणाच्या खिशातून घेणार? असा सवाल देखील संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
शिखर बँक घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ईओडब्ल्यूनं दिलेल्या क्लीन चिटला ईडीकडून आव्हान देण्यात आले आहे. यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
शिखर बँक संदर्भात क्लीन चीट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे. अशापद्धतीने हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करत खटले चालवायचे, त्यासाठी लाखो कोट्यवधी रुपये सरकारच्या खात्यातून पैसे काढून खटले चालवायचे आणि मग तो आरोपी पक्षात आला की त्याच्याबद्दल पुन्हा चांगले बोलायचे. खटला चालवताना जो काही खर्च होतो, तो कोणाच्या खिशातून घेणार आहे. असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले, विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग झालं आहे, हे काँग्रेसने मान्य केले आहे. आम्हालाही तो अनुभव आला आहे. त्यांना फार मोठ्या रकमा आणि जमिनीचे तुकडे दिले आहेत. अशा पद्धतीने आमदारांना पैसे देऊन मत फोडणे ही संविधानाची हत्या नाही का? सरकार बेकायदेशीर आहे. आमदार अपात्र करू शकतात त्याच पद्धतीच्या आमदारांना अशा पद्धतीने फोडणे चुकीचे आहे. म्हणून अमित शहा आणि नरेंद्र मोदी हेच खरे संविधानाची हत्या करत आहे, असंही राऊत म्हणाले.