मुंबई : शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. राऊत यांच्या कुटुंबियांकडून एक कोटी रुपयांची दलाली करण्यात आली, असं म्हणत माजी खासदार संजय निरुपम यांनी राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. सोमवारी पत्रकार परिषदेत घेत निरुपम यांनी संजय राऊत, अमोल कीर्तीकरांसह ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना ईडीने चौकशीसाठी आज बोलावले आहे. यावर संजय निरुपम यांनी निशाणा साधला आहे. निरुपम म्हणाले की, खिचडी चोराची आज चौकशी होत आहे. या घोटळ्यात आणखी काही लोक सामील आहेत. अमोल कीर्तीकर यांना अटक करा, असं देखील निरुपम यांनी म्हटले आहे. निरुपम काँग्रेस पक्षात असानाही देखील त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना विरोध दर्शवला होता.
या खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार हे संजय राऊत आहेत. यामध्ये खासदार संजय राऊत यांनी आपल्या पत्नीसह भाऊ आणि मुलीच्या नावाने पैसे स्वीकारले आहेत. सहयाद्री रिफ्रेशमेंटला खिचडी पुरवण्याचे कंत्राट मिळाले होते. हे कंत्राट सहा कोटी रुपयांचे होते. यामधील एक कोटी रुपये संजय राऊत यांच्या कुटुंबासह मित्रांना मिळाले आहेत. संजय राऊत यांची मुलगी विधिता राऊत हिच्या खात्यावर हे पैसे आले आहेत.
राऊत कुटुंबाकडून एक कोटीची दलाली घेतली गेल्याचा गंभीर आरोप निरुपम यांनी केला आहे. संदीप राऊत यांना देखील सहयाद्री रिफ्रेशमेंटकडून चेक आले असून त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. सहयाद्री रिफ्रेशमेंटला 300 ग्राम खिचडी पॅकेट पुरवण्याचे कंत्राट मिळाले होते.