मुंबई: मुंबई ते नागपूर या ७०० किमी मार्गादरम्यानचा प्रवास अवघ्या ८ तासांत करण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या इगतपूरी ते आमणे या शेवटच्या टप्याचे काम ९७ टक्के पूर्ण झाले आहे. मात्र आमणे ते वडपेदरम्यानच्या ४ किमी मार्गावरील काम पूर्ण करण्यास आणखी दोन महिने लागणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ्यच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
शेवटच्या टप्याचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असून, डिसेंबरदरम्यान मुंबई ते नागपूर विनाअडथळा थेट प्रवास करणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर नवे सरकार स्थापन झाल्यानंतरच समृद्धी मार्ग सर्वसामान्यांसाठी खऱ्या अर्थाने समृद्धीचा ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असणाऱ्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, समृद्धी महामार्गाचे नागपूर आणि शिर्डीदरम्यानच्या ५२० किमी लांबीच्या पहिल्या टप्याचे उद्घाटन डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते, तर शिर्डी आणि भरवीर दरम्यानच्या मार्गाचे उद्घाटन मे २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. उर्वरित ७६ किमी महामार्गाचे काम ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएसआरडीसीने समोर ठेवले होते. त्यानुसार इगतपुरी ते आमने टप्प्याचे काम पूर्ण झालेही, मात्र आमणे ते वडपेदरम्यानच्या ४ किमी मार्गाचे काम पूर्ण करण्यास दोन महिने जाणार आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व एमएसआरडीसी याबाबत मार्ग काढणार असून, जोपर्यंत वडपेपर्यंतचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत महामार्ग खुला करणे अशक्य असल्याचे दिसून आले आहे. इगतपुरी ते आमणे आणि वडपे हा मार्ग मुंबई-वडोदरा महामार्गाला जोडण्यात येणार असल्याने इगतीपुरी ते शांग्रीला रिसॉर्टचे कामही रस्ते विकास महामंडळाकडून पूर्ण करण्यात येत आहे.