बुलढाणा : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाची साडेसाती जायला काही तयार नाही. या महामार्गाच्या कामाचा सुमार दर्जा आता समोर येत आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तर कुठे भेगा पडलेल्या आहेत. समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरवरील चॅलेंज 332.6 वरील दोन डोंगरांना जोडणाऱ्या मोठ्या पूलाला गेल्या 15 दिवसापासून मोठ भगदाड पडल्याच्या समोर आले आहे. जवळपास दोन आठवडे उलटूनही समृद्धी महामार्ग प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
समृद्धी महामार्ग प्रशासनाला भगदाड पडल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यावर मुंबईकडे जाणाऱ्या पंधरा दिवसापासून या पुलावरील दोन लेन बंद करण्यात आल्या आहेत. आता फक्त एकच लेन सुरू आहे. त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहन चालकाला समोर पुलावर एकच लेन सुरू आहे. भरधाव येणाऱ्या वाहन चालक हा गोंधळून जात असल्याने या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता आहे.
दिवसेंदिवस हे भगदाड मोठे होत आहे. मुंबई कॉरिडोर वरील 332. 6 वरील याच पुलाचे बांधकाम सुरू असताना भला मोठा गर्डर कोसळून अनेक कामगार जखमी झाले होते. आता त्याच पुलाला मोठे भगदाड पडल्याने समृद्धीच्या या पुलावर कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. काल रात्री असाच एक अपघात या ठिकाणी टळला.
20 वर्षे खड्डे पडत नसल्याचा दावा फेल..
तब्बल 55 हजार कोटी रूपये खर्चून मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग बांधण्यात आला आहे. महामार्ग वाहतुकीला खुला करून अवघं एक वर्ष झालं, तोच या महामार्गाला मोठमोठाले तडे, भेगा पडल्याचं समोर येत आहे. त्यातच समृद्धी महामार्ग हा काही साधासुधा महामार्ग नाही. या ठिकाणी गाड्या सुपरफास्ट वेगाने धावतात. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजजवळ 3 सेमी रुंद आणि 50 फूट लांबीच्या भेगा पडल्या समोर आले होतं.
महामार्गासाठी एम-40 ग्रेडचं सिमेंट वापरल्यास 20 वर्षे खड्डे पडत नसल्याचा दावा एमएसआरडीसीने केला होता, पण तो आता फोल ठरल्याचे समोर आले आहे. माळीवाडा इंटरचेंजजवळच पुलावर असा खड्डा पडला असून कधीही अपघात होऊ शकतो, अशी अवस्था आहे.