टिटवाळा : टिटवाळा येथून साई पालखीसोबत पायी चालत जाणाऱ्या तिघा साईभक्तांना भरधाव कारने धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन साईभक्तांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घोटी सिन्नरदरम्यान घडली आहे. भावेश राम पाटील, रवींद्र उर्फ कवी सुरेश पाटील आणि साई राज भोईर अशी मृत्यू झालेल्या साईभक्तांची नावे आहेत. हे तिघे जण टिटवाळा मांडा कोळीवाडा परिसरातील रहिवासी होते.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रवींद्र आणि भावेश हे चुलत भाऊ असून रवींद्र यांचे लग्न झालेले आहे. त्यांना दोन लहान मुली आहेत. रिक्षा चालवून रवींद्र कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, साई आश्रय सेवा मंडळातर्फे शिर्डी येथे पायी पालखी नेली जाते. या पालखीत सुमारे दीडशे जण सहभागी होतात. यंदाही शनिवारी १३ जुलैला पालखी टिटवाळ्याहून शिर्डीच्या दिशेने निघाली होती.
या पालखीसोबत रवींद्र पाटील ,भावेश पाटील, साईराज भोईर व सलमान खान हे चौघे होते. मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पालखी घोटी आणि सिन्नरदरम्यान पोहोचली. यावेळी रवींद्र पाटील, भावेश पाटील, साईराज भोईर आणि सलमान खान या चार जणांना भरधाव कारने उडवले. या धडकेत रवींद्र, भावेश ,साईराज भोईर हे गंभीर जखमी झाले. तर सलमान खानला किरकोळ दुखापत झाली.
या घटनेनंतर चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रवींद्र पाटील, भावेश पाटील आणि साईराज भोईर या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सलमानवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.