मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपद आणि खातेवाटपावरून नाराजीनाट्य सुरू आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील त्यामुळे नाराज आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सर्वत्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे यांची नाराजी हेरल्याची चर्चा अजूनही सुरु आहे.
विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते राज्याचा कारभार हाकत आहेत. विधानसभेत बहुमत मिळाले नाही तर मुख्यमंत्री कोण, यावरून सध्या महायुतीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात खाते वाटपावरून कुरबुरी वाढल्या आहेत. शिंदे यांनी गृहमंत्रीपदावर दावा करत भाजपला अप्रत्यक्षरीत्या आव्हान दिले आहेत. भाजप मात्र हे खाते सेनेला सोडण्यास तयार नाही. मलईदार खातेसुद्धा भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याने शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे प्रचंड नाराज आहेत.
काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे हे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी निघून गेल्याने महायुतीची बैठक रद्द करावी लागली. त्यामुळे शिंदे यांची मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबत नाराजी असल्याचे उघड झाले. शिंदेंची नाराजी हेरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे यांची सातारा येथे जाण्यापूर्वी वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. मात्र दोन्ही नेत्यांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांसह बच्चू कडू यांनी देखील शिंदे यांची भेट घेतल्याचे सांगितले.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीहून मुंबईत परतल्यानंतर थेट सातारा जिल्ह्यातील दरे गावी रवाना झाले. शिंदे नाराज असल्याचे म्हटले जाऊ लागले. मात्र शिंदे नाराज नाहीत. त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते आराम करण्यासाठी त्यांच्या मूळ गावी गेल्याची सारवासारव शिवसेना उपनेते आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी केली. त्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे.