मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी 5 हजार रुपयांची अग्रीम मदत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित मदत दिली जाणार आहे. त्यामुळे पंचनाम्यांच्या प्रक्रियेला वेळ लागला, तरी सणापूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मुंबईत मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यानुसार, येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत राज्यातील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये एकूण 7,500 कोटी रुपये जमा होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली होती.
या मदतीसाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे महत्त्वाचे ठरणार आहे. फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट पैसे पाठवले जाणार आहेत. ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही, अशा शेतकऱ्यांची केवायसी तपासून मदतीबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मदतीची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर बँका थकीत कर्जाच्या वसुलीसाठी पैसे कापून घेतील, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर, मदतीच्या रकमेतून कोणतीही कपात करू नये, असे स्पष्ट निर्देश बँकांना देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे वृत्त आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. छोटे बंधारे बांधणे, तलावांचे रुंदीकरण करणे आणि गाळ उपसण्याच्या कामांवर भर देण्याबाबत चर्चा झाली. रायगड जिल्ह्याच्या धर्तीवर लोकसहभागातून छोटे बंधारे उभारून पाणी अडवणे आणि भूजल पुनर्भरण वाढवण्यावर भर देण्याची सूचना करण्यात आली. तसेच, सर्व मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांतील पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
दुसरीकडे, शेतकरी कर्जमाफीच्या चौथ्या यादीत 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहितीही समोर आली आहे.






