मुंबई : शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणी आज ‘ईडी’ कडून चौकशी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गट मोठं शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. तसेच बलार्ड पियर परिसरात ठिकठिकाणी रोहित पवार यांचे मोठ-मोठे बॅनर लावण्यात आले आहेत.
‘पळणारा नाही तर लढणारा दादा‘ अशा आशयाचे बॅनर वेगवेगळ्या भागात लावण्यात आले आहेत. दरम्यान, ईडी चौकशीला आपण सहकार्य करणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना शरद पवार हे पक्षाच्या कार्यालयात चौकशी पूर्ण होईपर्यंत बसून राहणार आहेत.
सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव : रोहित पवार
सध्याचे सुडाचे राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने माझ्याबाबत ‘ईडी’ने चुकीची कारवाई केली, तर कोणीही घाबरून जाऊ नये. उलट महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या आणि संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभे राहावे. असं रोहित पवार म्हणाले.
माझ्यासोबत सुप्रिया सुळे आणि स्वतः शरद पवार येत आहेत. वय झाले म्हणून काय झाले. वय झालेली माणसे तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल, तर आणखी काय हवे, असे रोहित पवार म्हणाले.
ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे, तसेच मुंबई पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकाच्या टीमही तैनात करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.