मुंबई: मला कुणासमोर वाकायला आवडत नाही, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वक्तव्य केलं आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना मी सहकार्य करत होतो, त्यावेळी अनेक अधिकाऱ्यांना कळत नव्हतं, नेमकं काय करायचं, कारण तुमच्या सर्वांचा आवाज त्या ठिकाणी पोहोचत होता, घोषणा ऐकू येत होत्या असंही रोहित पवार म्हणाले. एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो आणि त्याच्यावर कुठेतरी अन्याय होतो, असं ज्यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला समजलं की, त्यावेळी बाप माणूस म्हणून मागे उभे राहतात असंही पवार म्हणाले.
दरम्यान बारामती अॅग्रोसंबंधित प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे तब्बल 12 तासांनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले आहेत. रोहित पवार हे बाहेर आल्यानंतर ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ईडीच्या कार्यालयाला लागून असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.