मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता कि अपघातामध्ये गाडीचा चेंदामेंदा होऊन टेम्पो चालकाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो मागच्या बाजूने एका ट्रकवर जाऊन आदळला. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला.
अपघातग्रस्त ट्रकमधून साखरेची वाहतूक केली जात होती. या ट्रकवर मागच्या बाजूने कोंबड्यांनी भरलेला भरधाव टेम्पो येऊन धडकला. ही धडक इतकी भीषण होती की, टेम्पोच्या पुढील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. या जोरदार धडकेमुळे ट्रक आणि टेम्पोला आग लागली. त्यामुळे ट्रकचा मागील भाग आणि टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे जळून खाक झाला. त्यामुळे टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल पनवेल येथे दाखल करण्यात आले आहे.
दोन्ही गाड्यांची धडक झाल्यानंतर कोंबड्यांच्या टेम्पोची पुढची बाजू पूर्णपणे चेपली गेली. त्यामुळे टेम्पो चालकाचा मृतदेह आतमध्ये अडकून पडला होता. याशिवाय, टेम्पोला अपघातानंतर आग लागल्याने मदतकार्य करताना अडचणींचा सामना करावा लागला. अखेर आग विझवल्यानंतर बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी टेम्पोचा पत्रा कापून चालकाला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. जोरदार धडकेमुळे टेम्पोमधील काही कोंबड्याही दगावल्या. काहीवेळापूर्वी हा टेम्पो रस्त्यातून दूर करण्यात आला आहे. या भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने बचावपथकातील कर्मचाऱ्यांना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागला.