डोंबिवली : कल्याण डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्व येथील खंबाळपाडा परिसरात रिक्षा स्टँडवर रिक्षाचा नंबर लावण्यावरून एका रिक्षाचालकावर लोखंडी रॉडने हल्ला करून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ०२) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
अश्विन कांबळे असं हत्या करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुनील राठोड असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेर असलेल्या रिक्षा स्टँडवर अश्विन कांबळे आणि सुनील राठोड या दोन रिक्षा चालकांमध्ये वाद झाला. यावेळी रिक्षा चालकांनी मध्यस्थी करून दोघांचे भांडण सोडवले. मात्र त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे दोघे पुन्हा डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा येथे असलेल्या रिक्षा स्टँड जवळ आले. या दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद सुरू झाला.
दरम्यान, संतापलेल्या सुनील राठोड याने लोखंडी रॉडने अश्विन कांबळेवर हल्ला केला. या हल्ल्यात अश्विन याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुनील राठोड याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास टिळकनगर पोलीस करत आहेत.