मुंबई: मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील किनारी भागांना जोडण्यासाठी आता आणखी एक मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. सध्या मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागतो, पण रेवस आणि करंजा (Revas-Karanja Bridge) दरम्यान बांधला जाणारा हा नवा सागरी पूल हे अंतर फक्त 10 मिनिटांवर आणणार आहे. 20.04 किमी लांबीच्या या पुलामुळे एकूण अंतर 50 किमीने कमी होईल.

प्रवासाचा वेळ आणि अंतर कमी होणार
सध्या, मुंबईहून नवी मुंबई, पनवेल आणि पेण मार्गे अलिबागला जाण्यासाठी सुमारे 120 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, ज्यात अंदाजे दोन तास लागतात. रेवस-करंजा पुलामुळे हे अंतर कमी होईल. हा 2.04 किमी लांबीचा समुद्री पूल पूर्ण झाल्यावर, एमटीएचएल आणि नवाशेवा मार्गे मुंबईहून अलिबागचे अंतर खूपच कमी होणार आहे. विशेष म्हणजे, सध्या रेवस आणि करंजा दरम्यानचा सुमारे 70 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करायला दोन तास लागतात, तो या पुलामुळे फक्त 10 मिनिटांत पूर्ण होईल.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) या 2.04 किमी लांबीच्या पुलाचे बांधकाम करणार आहे. सुरुवातीला हा प्रकल्प 2,079 कोटी रुपयांचा होता, पण काही कारणांमुळे त्याची किंमत 42.56 टक्क्यांनी वाढली आहे. पुलाचे बांधकाम पुढील 3 वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
पुलाच्या दोन्ही बाजूला 1.5 मीटर रुंदीचा पादचाऱ्यांसाठीचा पदपथ देखील असेल. पुलाला जोडणारे रस्ते देखील बांधले जातील; कारंजामध्ये 5.13 किलोमीटर लांबीचा अप्रोच रोड आणि रेवसमध्ये स्टिल्टवर 1.17 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधला जाईल. हा पूल रायगड जिल्ह्यातील राज्य महामार्ग क्रमांक 4 वर चार पदरी बांधला जाईल, ज्याची रुंदी 29.50 मीटर असेल. या पुलावरून वाहने 80 किमी प्रतितास वेगाने धावू शकतील.







