मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी केंद्रीय राखीव पोलीस दलच्या (CRSF) अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पॅनेलने त्यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर राज्य सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांची राज्यातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणून ओळख आहे.
रश्मी शुक्ला या देखील 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. आता त्या राज्याच्या पोलीस महासंचालक बनल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळातील कथित फोन टॅपिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारनं त्यांची चौकशी सुरु केली होती. एकनाथ खडसे, संजय राऊत, नाना पटोले, आशिष देशमुख आणि बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आल्याची माहिती तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत देखील दिली होती. त्या दरम्यानच्या काळात रश्मी शुक्ला या प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफमध्ये रुजू झाल्या होत्या.