मुंबई : वेबसिरीज, ओटीटी प्लेटफॉर्म आणि हिंदी चित्रपटात भूमिका देण्यासह नोकरीच्या आमिषाने सुरु असलेल्या एका सेक्स रॅकेटचा कुरार पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी सहाजणांना वेगवेगळ्या पोलिसांनी अटक केली आहे. सुनिता रणखांबे, सोनी वाघमारे, अलजाज शेख ऊर्फ समीरअली, जाफर खान, अमीरअली जेदा आणि नजमुद्दीन टिनवाला अशी या सहाजणांची नावे आहेत. या अटकेनंतर बोरिवली स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
१८ वर्षांची पिडीत तरुणी ही तिच्या वयोवृद्ध आई, सहा भाऊ आणि बहिणीसोबत मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात राहते. जून महिन्यांत तिच्या आईची मैत्रिण सुनिता रणाखांबे ही तिच्या घरी आली होती. सुनिता ही टिटवाळा, रेश्माई विद्या मंदिरासमोरील विराट हॅरिटाईज अपार्टमेंटमध्ये राहत होती. तिने तिला नोकरीचे आमिष दाखवून दरमाह २० हजार रुपये पगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे ती तिच्यासोबत नोकरीसाठी टिटवाळा येथे गेली होती.
दुसऱ्या दिवशी सुनिता तिच्या मुलीसोबत तिला घेऊन एका हॉटेलमध्ये आली होती. तिथे तिने तिची ओळख समीरअली नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीशी करुन दिली होती. त्याने त्याच्या बाईकवरुन तिला कर्जत येथील नेरुळ रोड, डिमार्टजवळील इको ग्रीन इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये आणले. तिथे त्याने तिची ओळख आमीर या तरुणासोबत करुन दिली. त्यानंतर या दोघांनी तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले होते. ते प्यायल्यानंतर तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली. दुसऱ्या दिवशी तिला जाग आल्यानंतर तिला तिच्या अंगावर काहीच कपडे नसल्याचे दिसून आले. याबाबत तिने समीरकडे विचारणा केल्यानंतर त्याने तिला एक व्हिडीओ दाखविला होता.
तसेच जुलै महिन्यांत समीरने तिला बेलापूर, गोवा आणि नंतर कर्जत येथे आणले. तिथे त्याने तिला जबदस्तीने बिअर पिण्यास प्रवृत्त केले होते. त्यानंतर त्याने तिच्याशी अनेकदा जबदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. तिथे काही दिवस राहिल्यानंतर समीरने तिला पुन्हा टिटवाळा येथे आणले. अशा प्रकारे सुनितासह आमीर आणि समीर यांनी तिला चित्रपटात भूमिका देतो तसेच चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून टिटवाळा येथे आणून नंतर कर्जत, गोवा, हैद्राबाद आणि बेलापूर येथे ठेवून तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला. तिचे अश्लील व्हिडीओ बनवून तिने त्यांच्याविरुद्ध तक्रार केली किवा कोणालाही काहीही सांगितले तर तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना दोन महिलांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी सुनितासह तिची मुलगी सोनी वाघमारे, फिल्म प्रोडेक्शन कंपनीचा मालक समीरअली, त्याचा सहाय्यक जाफर, कर्जतच्या हॉटेलचा मालक आमीरअली आणि फर्निचर व्यावसायिक नजमुद्दीन अशा सहाजणांना अटक केली.