मुंबई : सायन कोळीवाडा येथील पंजाबी कॅम्पातील संक्रमण शिविराच्या अडगळीच्या जागेत एका नशेखोराने तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे. अनिल गुप्ता (वय-३४) असे नराधमाचे नाव असून तो याच भागात पदपथावर राहतो. ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला चोप देण्यात आला. पीडित चिमुकली व आरोपी अनिल गुप्तावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सायन कोळीवाडा पंजाबी कॅम्पातील दशमेश गुरुद्वारात सोमवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे भंडारा सुरू होता. गुरुद्वारालगत असलेल्या झोपडपट्टीत राहणारी चिमुरडी परिसरात एकटीच खेळत असताना गुप्ताची नजर तिच्यावर पडली. अंधाराचा फायदा घेत त्याने चिमुरडीला उचलून संक्रमण शिबिराच्या अडगळीत नेले आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
या वेळी रस्त्यावरील पादचाऱ्यांची नजर या नराधमावर पडली. पादचाऱ्यांनी तत्काळ धावत जाऊन नराधमाच्या कचाट्यातून चिमुकलीची सुटका केली. मात्र, चिमुकलीची अवस्था पाहून जमावाने नराधमाला बेदम चोप देत घटनेची माहिती अँटॉप हिल पोलिसांना दिली.