भिवंडी : पोलिसांच्या ताब्यातील एका २५ वर्षीय तरुणाचा रेल्वेमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हि घटना भिवंडी तालुक्यातील पच्छापूर परिसरात घडली आहे. अनिकेत जाधव (वय- २४ वर्षे) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर आणि मुलीच्या नातेवाईकांवर संशय व्यक्त केला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील पडघा पोलिस ठाण्याच्या परिसरातील ही घटना आहे. या मुलाने पळून जाऊन प्रेम विवाह केला होता. त्यामुळे पडघा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. मध्य प्रदेशावरून या तरुणाला घेऊन पोलिस राजधानी एक्स्प्रेसने येत होते. त्यावेळी रेल्वेमधून पडून तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी पोलिसांवर आणि मुलीच्या नातेवाईकांवर व्यक्त केला आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिस ठाण्याच्या हद्दीत पच्छापूर येथे अनिकेत जाधव हा राहत होता. अनिकेतचे वाशिंद येथील त्यांच्या नात्यातील अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. दोघांनी मध्यप्रदेश येथे पळून जाऊन लग्न केले होते. वाशिंद पोलिसांना अनिकेत मध्यप्रदेशात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून, त्यांनी मध्य प्रदेशातील पोलिसांच्या मदतीने त्या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर दोघेही सापडल्याची माहिती मिळताच मुलीच्या नातेवाईकांनी मध्य प्रदेश येथील पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. वाशिंद पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन ते मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येत होते.
त्यावेळी पोलिसांच्या ताब्यात असताना राजधानी एक्स्प्रेसमधून पडून अनिकेतचा मृत्यू झाला. अनिकेतच्या नातेवाईकांनी त्याचा मृत्यू मुलीच्या नातेवाईकांमुळे झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना सुद्धा अनिकेतचा रेल्वे अपघातात मृत्यू होणे एक संशयास्पद आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अनिकेतच्या कुटुंबीयांनी केली आहे.
अनिकेत ज्या दिवसापासून पळून गेला होता, त्या दिवसापासून वाशिंद पोलिसांनी आम्हाला मानसिक त्रास दिल्याचा आरोप अनिकेतच्या भावाने केला आहे. याबाबत सखोल चौकशी न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील रिपाइंचे किरण चन्ने यांनी दिला आहे. तर या घटनेविषयी पोलिसांची प्रतिक्रिया विचारली असता, पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास प्रतिसाद दिला नाही.