मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपामध्ये मिळत असलेल्या दुय्यम भूमिकेमुळे शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी भाजपवर जोरदार टीका केली होती. आमचा केसाने गळा कापून विश्वासघात करू नका, असा इशारा त्यांनी दिला होता. यानंतर अवघ्या काही तासांमध्येच रामदास कदम यांचे चिरंजीव सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सध्याचे अध्यक्ष ए. एल. जऱ्हाड हे दीर्घ कालावधीसाठी गैरहजर असल्याने त्यांना पदावरून बाजूला करत सिद्धेश कदम यांची त्या पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे. सिद्धेश कदम गेल्या काही दिवसांपासून मुंबईतून लोकसभा लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा होती. ही चर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूने शिवसेनेकडून माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेला लोकसभा जागावाटपामध्ये मिळत असलेल्या दुय्यम भूमिकेवरती टीका केली होती. त्यांनी भाजपला आरोपांच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षपद देऊन एक प्रकारे रामदास कदम आणि सिद्धेश कदम या दोघांनाही सरकारकडून थंड करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.