मुंबई: शिवसेना एकनाथ शिंदे गटातील नेते खासदार गजानन कीर्तीकर आणि माझ्यातील वाद आता मिटला असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर कदम यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. कीर्तिकरांच्या आरोपांमुळे आपण व्यथित झालो असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईमधील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून लोकसभेला गजानन कीर्तीकर हेच उमेदवार असतील तर त्यात चुकीचे काय, असा उलट प्रश्नही रामदास कदम यांनी केला.
मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून लोकसभा जागेसाठी रामदास कदम यांनी आपला मुलगा सिद्धेश कदम हा उमेदवार असेल असे म्हणत दावा केला होता. त्यानंतर गेले काही दिवसांपासून खासदार गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम यांच्यात वाद सुरु आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी खासदार गजानन कीर्तीकर यांच्यावर टीका करताना थेट त्यांच्या खासगी जीवनाचा उल्लेख केला.
पक्षातील दोन जेष्ठ नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादाची दखल शिंदे गटाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत आधी गजानन कीर्तीकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर वर्षावर रामदास कदम यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी बोलताना रामदास कदम यांनी म्हटले की, आता आमच्यातील वादावर पडदा पडला आहे. खासदार गजानन कीर्तीकर यांनी थेट प्रेस नोट काढण्यापेक्षा मुख्य नेत्यांसोबत चर्चा करावी असेही कदम यांनी म्हटले. सध्या मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून गजानन कीर्तीकर हे खासदार आहेत आणि भविष्यात जर पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास आपण त्यांच्या प्रचाराला जाऊ असेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले.