मुंबई: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय आठवले गट) च्या पदाधिकाऱ्यांनी जागावाटपात अन्याय झाल्याच्या निषेधार्थ राज्यभरात जेथे जेथे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी आपले अर्ज मागे घ्यावेत. आपण महायुतीचा घटक पक्ष असल्याने नाराजी दूर करत महायुतीचा प्रचार करावा, असे निर्देश रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले आहेत.
पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी या संदर्भात सांगितले की, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार, रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला विजयी करायचे आहे. जागावाटपाची नाराजी बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करायचा आहे. रिपब्लिकन पक्ष हा भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) महायुतीचा घटक पक्ष असून आपण सर्वजण विधानसभेसाठी एकजुटीने लढत आहोत. जागावाटपामध्ये रिपब्लिकन पक्षावर अन्याय झाला असून त्यामुळे नाराजी आहे, हे खरे असले तरी भाजप नेतृत्वाने महायुतीचे सरकार आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला राज्यात सत्तेत सहभागी करून घेण्याचे ठोस आश्वासन दिले आहे.
यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी पक्षाची पुढील वाटचाल लक्षात घेऊन रिपब्लिकन पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून राज्यात महायुतीच्या उमेदवारांचा एकजुटीने प्रचार करावा. ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी तत्काळ उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, असे रामदास आठवले यांचे आदेश असल्याचे पक्षाचे सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी म्हटले आहे.