मुंबई : भारतीय जनता पक्षाने आज पाचवी यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातील युवा नेते आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सुनील मेंढे यांना भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. तर अशोक महादेवराव नेते यांना गडचिरोली-चिमूर मधून तिकीट देण्यात आलं आहे. सोलापूरच्या जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय राम सातपुते यांना तिकीट दिल्याने आता सोलापुरात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते यांच्यात लढत पहायला मिळणार आहे.
दरम्यान, सोलापुरात विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे तिकीट भाजपने कापले आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरुद्ध राम सातपुते अशी लढत होणार आहे. तसेच भंडारा-गोंदियातून सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून गडचिरोली-चिमूर मतदारसंघासाठी अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशोक नेते यांना भाजपकडून पुन्हा संधी दिली आहे.
भाजपच्या पाचव्या यादीत कंगना राणौतला उमेदवारी
भाजपच्या पाचव्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कंगना मंडीमधून निवडणूक लढवणार आहे. तर बेगुसरायमधून गिरिराज सिंग यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. तसेच पटना साहिबमधून रवी शंकर प्रसाद लढतील. त्याचबरोबर सुल्तानपूरमधून मेनका गांधी यांना तिकीट देण्यात आलं आहे. भाजपने पाचव्या यादीत एकूण 111 उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत.
कोण आहेत राम सातपुते?
राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या राम सातपुते यांना 2019 च्या निवडणुकीत भाजपने माळशिरसमधून उमेदवारी दिली. राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा अवघ्या 2590 मतांनी राम सातपुते यांनी पराभव केला. विधिमंडळात आक्रमक भाषण, आंदोलनांमुळे ते कायम चर्चेत असतात. पहिल्यांदाच आमदार झालेल्या राम सातपुते हे आता लोकसभेच्या रिंगणात उतरले असून तीनदा आमदार असलेल्या प्रणिती शिंदेचा मुकाबला करणार आहेत.