मुंबई : अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाचा प्रतिष्ठापना सोहळा जवळ येत आहे. त्याला कोणतही गालबोट लागू नये अशी सर्वांची इच्छा आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजली. आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. आमदार राम कदम त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. याशिवाय मुंबई, पुणे आणि नाशकातही आंदोलने सुरू आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. जितेंद्र आव्हाडांना तात्काळ अटक करा, अशी मागणीही राम कदम यांनी केली आहे. श्रीराम मांसाहारी होते याचा पुरावा आव्हाडांनी द्यावा, पुरावा नसेल तर आव्हाडांनी देशाची, राम भक्तांची माफी मागावी, भव्यदिव्य राममंदिर बनतंय यामुळे त्यांच्या पोटात दुखतंय, असं राम कदम म्हणाले आहेत.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. आपण इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे असे वक्तव्यही जितेंद्र आव्हाड यांनी केलं.