मुंबई: राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून एका सदस्याची निवडणूक घेण्यासाठीची सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयामार्फत जारी करण्यात आली आहे. यानुसार उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला १३ जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असून, निवडणूक लढवली गेल्यास २५ जून २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) (कार्यभार) व निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे किंवा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सह सचिव व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर किंवा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोहन सदाशिव काकड यांच्यापुढे १३ जून २०२४ पर्यंत सार्वजनिक सुट्टीव्यतिरिक्त कोणत्याही दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कक्ष क्र. १४५, पहिला मजला, विधान भवन, बॅकबे रेक्लेमेशन, मुंबई-३२ येथे नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्र याच ठिकाणी व याच वेळेत मिळू शकतील.
नामनिर्देशन पत्रांची छाननी १४ जून २०२४ रोजी दुपारी १२ वाजता करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा ती सूचना देण्याचे लेखी अधिकार उमेदवाराकडून देण्यात आलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकामार्फत किंवा त्याच्या निवडणूक एजंटला वर उल्लेख केलेल्या अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात १८ जून २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत देता येईल. तसेच निवडणूक लढवली गेल्यास २५ जून २०२४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) (कार्यभार) व निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी कळवले आहे.